मुंबई : कोरोना लसीकरणावरून (Corona Vaccination) राजकीय खडाजंगी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असताना दुसरीकडे कोरोना लसीकरणावरून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा आरोप केला होता. यालाच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशातील लोकांना आधी कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. (ncp leader jayant patil criticized modi govt on corona vaccination)
मुंबईत पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारवर कोरोना लसीकरणावरून टीका केली. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या आरोपांवरून जयंत पाटील यांना विचारले असता, भारतात लस नसली तरी चालेल पण परदेशात पाठवा असे केंद्राचे धोरण आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आघाडीवर आहे. जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला
जावडेकरांनी आधी उत्तरे द्यावीत
राज्यात किती लसी आल्या याची संख्या माझ्याकडे नाही. ती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे असेल. भारतामध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. आपल्या देशात निर्माण होणाऱ्या लसी ते वेवगेळ्या देशांना का वाटत आहेत, याचे उत्तर आधी प्रकाश जावडेकर यांनी द्यावे. जगाच्या कोरोनाविरुद्ध लढाई जबाबदारी भारतावर आहेच; परंतु, आधी देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ४४ टक्केच कोरोना लसीकरण झाले आहे. तर ५६ टक्के लसी पडून कशी राहिल्या, असा सवाल करत प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राने १२ मार्चपर्यंत २३ लाख लसींचाच वापर केला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एकूण ५४ लाख लसी देण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ ५६ टक्के लसींचा साठा वापरलाच नाही, असा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला.