मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता नवनवीन माहिती मिळत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) सल्ला दिला आहे. एनआयएने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. (ncp leader jayant patil give reaction on sachin vaze NIA investigation)
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत संपूर्ण तपास झाल्यावर तसचे निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच एनआयएने यासंदर्भात बोलावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी या प्रकरणात त्यांची भूमिका मांडली.
शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी
समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश
NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागल्यानंतर अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जात आहे. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. परंतु, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या सोडू नयेत, असे जयंत पाटील म्हणाले.
राणेंची अवस्था पाण्यातून काढलेल्या माश्यासारखी
भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असे झाले आहे. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. काहीही झाले की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात. असे असेल, तर मग प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना तात्काळ घरी पाठवावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.