मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी डेंग्यू झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली असून यासोबत मेडिकल रिपोर्ट सुद्धा पोस्ट केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे की, "कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन."
जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांनी लवकर बरे व्हावं, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच, आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आजारपणातून लवकर बाहेर पडणे, हे शरद पवार गटासाठी महत्त्वाचे आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडूनही या वृत्तावर दुजोरा देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे , अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर बरेच दिवस अजित पवार प्रसारमाध्यमांसमोर आले नव्हते. तसेच ते कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसले नव्हते. मात्र, डेंग्यूपासून दिलासा मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. कारण, अजित पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर अजित पवार व शरद पवार यांची देखील भेट झाली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेट दिवाळीच्या सेलिब्रेशनबाबत होती.