राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी चेंबूर येथे जोरदार निदर्शने केली. षड्यंत्र रचून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सुडाचे हेे राजकारण भाजपलाही परवडणारे नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने भाजपविरोधात शुक्रवारी आंदोलन केले. चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनात पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात ज्या सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय, त्याविरोधात राज्यात आणि देशात जनभावना तीव्र आहे. जनता याबाबत नाराजी व्यक्त करत असून, राजकीय सूडभावनेची कारवाई भाजपलाही परवडणारी नाही, असे पाटील म्हणाले. सर्व कारवाया सुडाच्या भावनेतूनच होत आहेत; तर काही लोक षड्यंत्र रचून राज्यातील प्रमुख नेत्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या निषेधासाठी आघाडीकडून राज्यभर आंदोलने केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकत्यांची उपस्थितीनवाब मलिकांवरील कारवाई ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे, असेही पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांच्यासह युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबई युवक अध्यक्ष नीलेश भोसले, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, युवती प्रदेश उपाध्यक्षा सना मलिक आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.