सातारा : 'उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन' असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उदयनराजे यांना सणसणीत टोला लगावला आहे.
संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यासह भाजपा नेत्यांनीही निषेध केला. यावर साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली. 'कर्म असते, जे आपण या जन्मी करतो तेच आपल्याला फेडावे लागते', अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती.
उदयनराजे भोसले यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला आहे. "उदयनराजे भोसले काय बोलतात याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. मुळात ते संध्याकाळी बोलले आहेत, ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन", असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांना गेली 40 वर्ष वेळोवेळी मदत केली आहे, आधार दिला त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या घरापर्यंत अशा पद्धतीने जाणार नाही. हे मुद्दामपणे आणि जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. जे तिथे आले ते एसटी कर्मचारी होते का, ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल? असेही जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते उदयनराजे?शरद पवारांच्या घरावर हल्ल्यावर पत्रकारांनी छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, काय सांगायचं? माझ्याकडून काय अपेक्षित आहे. मी असं बोललं पाहिजे बरं झालं, चांगले केले. अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार आहे. कर्म असतं, जे आपण या जन्मी करतो तेच आपल्याला फेडावं लागते. हे माझ्यासह सर्वांनाच लागू आहे. यावर अजून काय बोलणार? असं भाष्य त्यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या घरावर हल्लाराज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या 4 महिन्यापासून सुरू आहे. मात्र शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले. पवारांच्या घरावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यासह भाजपा नेत्यांनीही निषेध केला. या हल्ल्यामागे कोण आहेत ते शोधून काढा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.