"भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे? हे विचार करण्यासारखं" 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:43 PM2021-10-07T16:43:21+5:302021-10-07T16:48:22+5:30

NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही. तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

NCP Leader Jayant Patil's reaction on IT Raids on Firms Linked to Ajit Pawar | "भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे? हे विचार करण्यासारखं" 

"भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे? हे विचार करण्यासारखं" 

Next

मुंबई : आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने सुरू केलं असून भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे? हे विचार करण्यासारखं आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी केली. (NCP Leader Jayant Patil's reaction on IT Raids on Firms Linked to Ajit Pawar)

आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही. तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी भाजपावर केला. 

आजपासून राज्यातली धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडली गेली असून सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

'अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत'
धाड टाकली जाणार किंवा कारवाई केली जाणार हे भाजपाच्या नेत्यांना आधी कळतं. त्यामुळे या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजपा चालवत आहे, यावर आता जनतेचा विश्वास बसला आहे, असे जयंत पाटील म्हणाले. अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही दडवत नाहीत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

'लखीमपूरमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी'
लखीमपूर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जालियनवाला बागेपेक्षा क्रूर कृत्य तिथे केले गेले होते. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळत आहे. भाजपाला हे सहन झाले नसेल म्हणून ही कारवाई करण्यात आली असेल, असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

Web Title: NCP Leader Jayant Patil's reaction on IT Raids on Firms Linked to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.