मुंबई : राज्यात काल झालेल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. निकाल जाहीर होताच प्रत्येक पक्ष यशाचा दावा करू लागला आहे. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजपाने प्रचार सुरू केला आहे. त्याचवेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निकालानंतर मोठे विधान केले आहे. भाजपाच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते. यापुढील निवडणुकांमध्येदेखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. (NCP Leader Jayant Patil's Reaction On Zilla Parishad, Panchayat Samiti By Election Results)
'जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालांतून महाविकास आघाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८५ पैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यातील १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने केलेल्या कामाच्या सोबत जनता असल्याचे दिसून आले आहे,' असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, आज राज्यातील ६ जिल्हयांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मधील पोटनिवडणूकांचा निकाल जाहीर झाला आहे. विकास कामे केल्याने जनता महाविकास आघाडी सोबत असल्याचे या निकालांतून सिद्ध झाले आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा - नाना पटोलेराज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्वाचा असतो, आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करु शकलो.
काँग्रेस पक्षाने स्वंतत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भाजपाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत आणि याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो, संविधान, लोकशाहीचे रक्षणही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.