Maharashtra Politics: “मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे लागतील”; योगींच्या दौऱ्यावरुन NCPची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 09:55 AM2023-01-05T09:55:35+5:302023-01-05T09:57:42+5:30
Maharashtra News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
Maharashtra Politics: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये उद्योग वाढावेत, फिल्म सिटी तयार व्हावी, हा मुख्य उद्देश या दौऱ्याचा असल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर सडकून टीका केली आहे. गोरखपूर आणि मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील, असा टोला लगावण्यात आला आहे.
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात योगी आदित्यनाथ टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
मुंबई मराठी माणसाची आहे
गोरखपूर आणि मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील. मुंबई मराठी माणसाची आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असो नाही तर इतर कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही. मुंबईच्या मातीची शानच काही वेगळी आहे. मुंबईची मातीच परिस्पर्शाची माती असून, अशी मुंबई जगाच्या पाठीवर बनूच शकत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी. उत्तर प्रदेशला अच्छे दिन यावे यासाठी योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा आयोजित केल्याचे सांगितले जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही टीकास्त्र सोडले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"