पवारांच्या बंडाशी तुलना, अजितदादांवर भडकले आव्हाड; सविस्तर पोस्ट लिहीत चढवला हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 04:19 PM2023-12-27T16:19:48+5:302023-12-27T16:22:10+5:30

स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे, असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

ncp leader jitendra awhad Attacked dycm ajit pawar by writing a detailed post | पवारांच्या बंडाशी तुलना, अजितदादांवर भडकले आव्हाड; सविस्तर पोस्ट लिहीत चढवला हल्ला!

पवारांच्या बंडाशी तुलना, अजितदादांवर भडकले आव्हाड; सविस्तर पोस्ट लिहीत चढवला हल्ला!

Jitendra Awhad Vs Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच बारामती येथील भाषणात स्वत: केलेल्या बंडाची तुलना १९७८ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाशी केली. अजित पवारांनी आपल्या निर्णयाची तुलना थेट शरद पवारांशी केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले असून आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहीत अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

"अजितदादांनी स्वतःची तुलना साहेबांच्या निर्णयाशी करावी, हे जरा हास्यास्पदच वाटत आहे. साहेबांनी ज्या वयात सत्तांतर केलं; त्या वयात तुम्हाला ते करताही आले नसते आणि त्यांनी जे केले ते तुम्हाला ६३ व्या वर्षीही जमले नाही. तुम्ही कितीही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तरी उजव्या मांडीवर कोण आणि डाव्या मांडीवर कोण, हे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी माणसाला कळतंय," अशा शब्दांत आव्हाड यांनी अजित पवारांचा समाचार घेतला आहे.

शरद पवार यांनी १९७८ मध्ये केलेल्या बंडाबद्दल भाष्य करताना जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं आहे की, "साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते ३८ वर्षांचे होते. पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद, या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते एस.एम. जोशी यांनी पुढे आणली. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती. पण, त्या काळात दिल्लीच्या हायकमांडमध्ये  नाशिकराव तिरपुडेंचा दबदबा होता. अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे, असे सर्वच पुरोगामी नेत्यांना वाटत होते अन् यशवंतराव चव्हाणांनी मान हलवल्यानंतरच  पुढील घडामोडी घडल्या. यामध्ये सर्वात मोठी भूमिका एस.एम. जोशी यांची असल्या कारणाने त्यांनी शरद पवार साहेब यांचे नाव सुचवलं. त्यावेळेस असलेल्या जनता पार्टीची निर्मिती ही जयप्रकाश नारायण यांनी केली होती आणि जनसंघ हादेखील जनता पार्टीत विलीन केला होता. जनसंघाचे अस्तित्व संपले होते आणि भारतीय जनता पार्टीची निर्मिती व्हायची होती. त्यामुळे कुठलाही जातीयवादी पक्ष हा पुलोदचा भाग नव्हता. अर्धवट माहितीच्या आधारे साहेबांवर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की साहेबांनी कधीच जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी केली नाही. कारण की, सन १९८१ मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या आधीच पुलोदचे सरकार बरखास्त होऊन दुसरे सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे अजितदादांनी स्वतःची तुलना साहेबांच्या निर्णयाशी करावी, हे जरा हास्यास्पदच वाटतेय. एवढ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री होणे आणि समान तत्वावर सरकार चालवणे, ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळेस उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील,  एस .एम. जोशी,  ना. ग. गोरे असे  दिग्गज नेते महाराष्ट्राच्या राजकारणात होते," असं आव्हाड म्हणाले.

"दोघांमध्ये बरंच अंतर" 

अजित पवारांनी स्वत:ची शरद पवारांशी केलेल्या तुलनेचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड यांनी पुढे म्हटलंय की, "स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे. त्यामुळे साहेबांनी ज्या वयात केले; त्या वयात तुम्हाला ते करताही आले नसते आणि त्यांनी जे केले ते तुम्हाला ६३ व्या वर्षीही जमले नाही तुम्ही कितीही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तरी उजव्या मांडीवर कोण आणि डाव्या मांडीवर कोण, हे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी माणसाला कळतंय. आधी थोडीशी माहिती करून घेतली असती तर अशी गल्लत झाली नसती आणि या सर्व प्रकरणाला स्वर्गीय मा. यशवंतराव चव्हाण यांची मान्यता होती. तेव्हा राजकारण म्हणजे साखर कारखाना; राजकारण म्हणजे बँका ; राजकारण म्हणजे इथेनॉल फॅक्टरी ; राजकारण म्हणजे सहकारी उद्योग असे समीकरण नव्हते. तर महात्मा गांधीजींचा वारसा घेऊन चाललेले नेते हे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे जात होते. हाच आजच्या आणि तेव्हाच्या राजकारणातला फरक आहे," असा टोला आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Web Title: ncp leader jitendra awhad Attacked dycm ajit pawar by writing a detailed post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.