मुंबईतील व्हाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी एक समिती स्थापन करणार असून नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असंही शरद पवार म्हणाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याकडे राजीनामा परत घेण्याची मागणी केली आहे.
“पवार साहेब तुम्हाला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूनं लोकहीत आहे त्याच बाजूनं निर्णय झाला पाहिजे. कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असं तुम्ही आम्हाला सांगत आले आणि आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार,” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. “साहेब तुम्हाला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल,” असंही ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली २४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनीक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली ६३ वर्ष अविरत सुरू आहे. यातील ५६ वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे. राज्यसभेची पुढची तीन वर्ष राहिली आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या अधिकाधिक प्रश्नांवर लक्ष घालण्यावर माझा भर असेल, असंही शरद पवार म्हणाले.
आपल्याला माहिती आहे, माझा अनेक संस्थांशी कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर मुंबई, महात्मा गांधी सर्वादय संघ, अशा अनेक संस्थांच्या कामकाजामध्ये माझा सहभाग आहे, या कार्यांवर मी अधिक भर देणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.