Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपाल कोश्यारी, भाजप प्रवक्ते त्रिवेद यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानांचा स्पष्ट शब्दांत तीव्र निषेध केला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक होत मोठा इशारा दिला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केलेली पाठराखण निश्चितच प्रत्येक शिवप्रेमीला दुःखदायक वाटणारी आहे. त्यांच्या भूमिकेचे समर्थन कशासाठी? अशी विचारणा करत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व छुप्या संघी समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या घृणास्पद वक्तव्याबद्दल तसेच सुधांशु त्रिवेदी या भाजप प्रवक्त्याने उधळलेल्या मुक्ताफळाबद्दल भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाराही अमोल मिटकरींनी दिला.
भाजपने यावर भूमिका स्पष्ट करावी
सावरकरांच्या पत्राची तुलना शिवाजी महाराजांच्या पत्राशी करणे हा केवळ मुर्खपणा आहे. भाजपने यावर भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येईल, तेव्हा त्यांना चोप दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा आक्रमक इशारा मिटकरींनी दिला. तसेच भाजपचे वादग्रस्त प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी अक्कलेचे तारे तोडताना सावरकरांच्या माफीनाम्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याशी केली आहे. इतिहासानुसार मिर्जाराजे जयसिंगांबरोबर तहाची बोलणी असेल किंवा अफजल खानाशी झालेला पत्रव्यवहार असेल, हा गनिमी काव्याचा भाग होता. महाराज जसे दोन पावले मागे आले, त्यानंतर त्यांनी शत्रूंवर तितक्याच ताकदीने हल्लाही केला. मात्र, सावरकर बाहेर आल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरोधात कोणतेही बंड केले नाही, असे इतिहास सांगतो, असे अमोल मिटकरी म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असतील. पण त्याच वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांबद्दल केलेल्या निंदनीय विधानात त्यांना काहीही चुकीचे दिसत नाही, हे अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"