'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:34 AM2021-07-14T05:34:05+5:302021-07-14T05:35:46+5:30

Sharad Pawar : शरद पवार यांचा काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल. नाना पटोले बैछकीला अनुपस्थितीत.

ncp leader mp sharad pawar meeting with congress leaders for election participate individually | 'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !'

'तुम्ही खरंच एकटं लढणार का, ठरलं असेल तर स्पष्ट सांगा !'

Next
ठळक मुद्देशरद पवार यांचा काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल.नाना पटोले बैछकीला अनुपस्थितीत.

अतुल कुलकर्णी

मुंबई : तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार आहात का? तुमचा निर्णय झाला असेल तर तसे स्पष्ट सांगा, या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपली नाराजी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

गेल्या काही दिवसापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ आणि त्यातून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पक्ष वाढवण्याच्या भाषेविषयी आपल्या मनात कुठलीही शंका नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढलादेखील पाहिजे. मात्र, ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही, अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा शब्दात पवार यांनी स्पष्टपणे स्वतःचे मत सांगितल्याचे वृत्त आहे.

पुढच्या सगळ्या निवडणुका एकट्याने लढण्याचा तुमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर मला त्याविषयी काहीच बोलायचे नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण यासंबंधीचे अधिकार दिले आहेत का? दिले असतील तर तसेही सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही, असेही पवार यांनी ऐकवले. 

आम्ही तिघेही अनेक वर्षे राजकारणात आहोत. अवास्तव न बोलण्याच्या मताचे आम्ही आहोत, अशी भावना एच. के. पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली. आरबीआय आणि केंद्रीय वित्त विभागाकडून सहकारी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांबाबत जारी करण्यात आलेले वेगवेगळे निर्णय, बदलण्यात आलेले नियम व त्यामुळे सहकारी वित्त पुरवठा  क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसमोर निर्माण झालेल्या अडचणी यांबाबत देखील पवार यांनी स्वत:ची मते सांगितली.
देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन, त्याअनुषंगाने राज्य सहकारी कायद्यात केलेले बदल, राज्यातील राजकीय परिस्थिती, येऊ घातलेल्या विविध निवडणुका, यावर या बैठकीत चर्चा झाली.

डाटा लवकर गोळा करण्याच्या सूचना
मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिल्लीत काय घडले यावर देखील बैठकीत चर्चा झाली. अशोक चव्हाण यांनी याविषयीची विस्तृत माहिती पवार यांना दिली. सर्वोच्च न्यायालयात गायकवाड कमिशनचा जो डाटा देण्यात आला होता, तो पुरेसा नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यामुळे नवीन आयोगाकडून लवकरात लवकर डाटा गोळा करावा, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. ओबीसी समाजाच्या एम्पिरिकल डाटाबद्दल देखील यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पटोले अनुपस्थित
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या बैठकीला येण्याची इच्छा होती. मात्र, आम्ही शरद पवार यांना तीनच नावे कळवली आहेत, असे उत्तर प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्यामुळे पटोले यांना जाता आले नाही, असेही सांगण्यात आले.

विधानसभा अध्यक्षाचे नाव तुम्ही ठरवा
विधानसभेच्या अध्यक्षपदासंबंधी यावेळी चर्चा झाली. हे पद काँग्रेसला दिले होते. त्यात कसलाही बदल होणार नाही. तुम्ही कोणाचेही नाव ठरवा, आमचा त्याला विरोध असणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महामंडळांच्या नेमणुका लवकर करता येतील तेवढे बरे होईल, अशी मागणी पाटील यांनी पवार यांच्याकडे केली. देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन, त्याअनुषंगाने राज्य सहकारी कायद्यात केलेले बदल यावर या बैठकीत चर्चा झाली.

Web Title: ncp leader mp sharad pawar meeting with congress leaders for election participate individually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.