मुंबई: देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावण्यात आली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकNawab Malik यांनी केले.
रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रकरणाचा तपास भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेSameer Wankhede आणि फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी २००८ मध्ये नोकरीवर येतो आणि १४ वर्षांत मुंबईबाहेर जात नाही, यामागचं कारण काय..?, असा सवाल मलिक यांनी विचारला.
राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असा अतिशय गंभीर आरोप करणाऱ्या मलिकांनी काही जणांची नावंही घेतली. 'मुन्ना यादव नागपुरातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला बांधकाम कामगार बोर्डचं अध्यक्षपद देण्यात आलं. मुन्ना यादव तुमच्या गंगेत न्हाऊ पवित्र झाला होता का?, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.
हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो की नाही? त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे की नाही? मालाड पोलीस ठाण्यानं या प्रकरणाचा तपास सुरू केला. बंगाल पोलिसांनी त्याची कागदपत्रं बनावट कागदपत्र ठरवली. तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून तुम्ही ते प्रकरण दाबलं की नाही? त्याच हैदर आझमची तुम्ही मौलाना आझाद फायनान्स महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली की नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती मलिक यांनी केली.