मुंबई : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विरोधक असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) क्रमांक एकवर गेल्याची दवंडी पिटत आहे. मात्र, भाजपकडून करण्यात येत असलेले दावे खोटे आहेत. भाजपची पुरती धुळधाण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने ८० टक्के जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपकडून विविध प्रकारचे खोटे दावे करून भ्रम पसरवण्याचे काम केले जात आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.
औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात, अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेल्या वादामुळे काही ठिकाणी आम्ही एकत्र लढू, तर काही ठिकाणी स्वबळावर लढू, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकार बेळगावप्रश्नी सकारात्मक आहे. बेळगाव, निपाणीसह मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकार पावले उचलत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, कुणी काहीही दावा केला असला, तरी माझ्याकडे आकडेवारी आहे. आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे ६ हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. राज्यातील एकूण बिनविरोध ग्रामपंचायींपैकी भाजपने ५८० ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि अन्य काही ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी असून, त्यातही भाजपला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला आहे.