तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. जेव्हा NIA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमबीर सिंग यांनी भाजपसोबत डील केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचे काम केले. त्या 'डील' मुळे NIA ने परमबीर सिंग यांना आरोपी केलेले नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता भाजप NIA ला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही हे सांगत आहेत हे एकदम हास्यास्पद असल्याचा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.
यापूर्वीही भाजपवर निशाणा"परमबीर सिंग यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले," असा आरोपही त्यांनी यापूर्वी केला होता. NIA ने जे चार्जशीट दाखल केले आहे त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले होते असे सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते.