माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने चार आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली. तोपर्यंत देशमुख यांना कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर, आता अनिल देशमुख यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. "अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला हे सगळं राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली."माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हे सगळं त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे," असे नवाब मलिक यांनी सांगितले.केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय संस्थांचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे. त्याचपद्धतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे असेही नवाब मलिक म्हणाले. हा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला, पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखलकाय आहे प्रकरण?माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. मुंबईतील बार व रेस्टॉरंटकडून दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट त्यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला दिल्याचे पत्रात म्हटले आहे. वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले. याप्रकरणी, व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील व माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचारप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले.
देशमुख यांनी दिला राजीनामाउच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी ५ एप्रिल रोजी पदाचा राजीनामा दिला. सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली आणि त्यांच्या घरी झाडाझडतीही घेतली. दरम्यान, २१ एप्रिल रोजी सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात ३ मे रोजी याचिका दाखल केली. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, राज्य सरकारच्या मंजुरीशिवाय सीबीआय गुन्हा नोंदवू शकत नाही. पक्षपातीपणा करून व कुहेतून आपल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामागे राजकीय वैर आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात काहीही स्पष्ट नाही.