Ajit Pawar : "अजित पवारांच्या खर्चाकडे बोट दाखवणाऱ्यांनी स्वत: किती खर्च केला हे पाहावं"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:42 PM2021-05-13T14:42:50+5:302021-05-13T14:44:06+5:30
अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ६ कोटींची निधी राखीव ठेवल्याची माहिती आली होती समोर. यानंतर विरोधकांकडून करण्यात आली होती टीका.
कोरोना संकटामुळे (Corona Crisis) राज्याच्या तिजोरीत पैशांचा (Financial crisis) ओघ कमी झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने थकविलेले जीएसटीचे पैसे द्यावेत अशी मागणी करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांसाठी (Ajit Pawar) कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे विकासकामांवरील निधीला कात्री लावलेली असताना अजित पवारांचेसोशल मीडिया सांभाळणाऱ्यांसाठी तब्बल ६ कोटींचा निधी राखीव ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Rs 6 crore set aside by Maharashtra Government for Ajit Pawar’s social media handlers) यावरून विरोधकांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र अजित पवार यांची पाठराखण केलेली दिसत आहे.
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याच्या प्रचार व प्रसारासाठी जो खर्च होणार आहे त्याकडे जे बोट दाखवत आहेत, त्यांनी स्वतः सत्ता असताना किती खर्च केला याकडे लक्ष द्यावा," असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. "सरकारमध्ये काम करत असताना प्रचार व प्रसार, माहिती देणे गरजेचे असते पण ६ कोटी रुपये खर्चावर जे लोक बोट ठेवत आहेत, त्यांनी त्यांच्या सरकारमधील मुख्यमंत्री व प्रत्येक मंत्र्यांवर किती पैसे खर्च केले यावर लक्ष द्यायला हवे," असेही नवाब मलिक म्हणाले.
"केंद्र सरकार व भाजपशासित सरकारे प्रचार व प्रसारासाठी वारेमाप खर्च उधळपट्टी करतायत. त्या तुलनेत जास्त नाही हे विरोधकांना कळलं पाहिजे," असंही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले. यानुसार अजित पवारांकडे असलेल्या उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क या खात्यांबाबतचे निर्णय, आदेश आदींची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी कंपनी नियुक्त केली जाणार आहे. या कंपनीला या कामासाठी ६ कोटींचा निधी दिला जाणार आहे. ही कंपनी अजित पवारांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम आदी सांभाळणार आहे. तसंच व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि संदेश पाठविण्याचे कामही या कंपनीला दिले जाणार आहे. पवारांचे सचिव, जनसंपर्क विभागाशी चर्चा झाल्यानंतर हे काम या कंपनीकडे दिले जाईल.