मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं चर्चेत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिक यांनी मोहीमच उघडली आहे. सातत्यानं पत्रकार परिषदा घेत मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले. वानखेडेंनी चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवली, बोगस कागदपत्रांचा आधार घेतला, असे आरोप मलिक यांनी केले. वानखेडेंच्या अनेक कारवायांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सध्या चर्चेत असलेल्या नवाब मलिकांनी लोकमतच्या फेस टू फेस कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील घटना उलगडून सांगितल्या. तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस कोणते, असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आला. त्यावर गेले ४० दिवस आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते, असं मलिक यांनी सांगितलं. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुंबईजवळ क्रूझ बोटीवर एनसीबीनं धाड टाकली. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती अशी माहिती एनसीबीनं दिली. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अनेकांना अटक करण्यात आली.
एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी पहिल्या दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कारवाईच्या आडून एनसीबीचे अधिकारी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप करून मलिक यांनी खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेंनी केलेल्या अनेक कारवायांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर वानखेडेंचा पाय खोलात सापडला. त्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली.
'आताचे ४० दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस आहेत. माझ्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आलं. त्यावेळी मी अतिशय असहाय होतो. मी त्यावेळी काहीही बोललो असतो, तरीही लोकांनी विश्वास ठेवला नसता. पण जावयाला जामीन मिळाला. त्याची सुटका झाली. त्यानंतर मी या प्रकरणाच्या मुळाशी गेलो. त्यातून बऱ्याच गोष्टी हाती लागल्या. कारवाई्च्य आडून काय चालतं त्या गोष्टी मग मी उजेडात आणल्या. अन्यायाविरोधात संघर्ष करायचा हा माझा स्वभाव आहे. गेले ४० दिवस हा संघर्ष अतिशय उत्तम सुरू आहे. त्यातून मला आनंद मिळाला,' असं मलिक यांनी सांगितलं.