राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:35 PM2023-12-06T17:35:04+5:302023-12-06T17:44:25+5:30

हिवाळी अधिवेशन काळात नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या नक्की कोणत्या गटात बसणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

NCP leader Nawab Malik will participate in Winter Session Maharashtra | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार?

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हेदेखील सभागृहात दिसणार आहेत. ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर गेलेले मलिक हे सध्या जामिनावर बाहेर असून अनेक दिवसांनी ते सभागृहात दिसतील. 

हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक हे मुंबईतून नागपूरकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर बहुतांश आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेल्या जामिनानंतर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक नक्की कोणत्या गटात जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन काळात ते नक्की कोणत्या गटात बसणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी यापूर्वी आपण तटस्थ राहणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. हीच भूमिका आगामी काळात ते कायम ठेवतात का, हे पाहावं लागेल.

नवाब मलिक प्रकरण नेमकं काय?

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे फेब्रुवारी २०२२ पासून तुरुंगात होते. परंतु, तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचार करता यावेत याकरता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, उच्च न्यायालयाच्या न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी नवाब मलिक यांचा वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला होता. याविरोधात नवाब मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर नवाब मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला होता. १ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन दिला होता. त्यानंतर नवाब मलिक यांच्या जामिनात आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली. 

दरम्यान,  कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर नबाव मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने कोट्यवधी रुपयांचा भूखंड अत्यंत अल्प किंमतीत विकत घेतला. ज्यांच्याकडून भूखंड खरेदी करण्यात आला त्यापैकी एक व्यक्ती मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित तर दुसरी व्यक्ती संघटित गुन्हेगार असल्याचा आरोप आहे. यातील एक जण कुख्यात गुंड दाऊदची बहिण हसीना पारकर हिचा अंगरक्षक होता. 

Web Title: NCP leader Nawab Malik will participate in Winter Session Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.