“आज शिंदे यांचं सरकार आहे. त्यात कोणाला घ्यायचं कोणाला कोणती खाती द्यायची याचा सर्वस्वी अधिकार हा एकनाथ शिंदेंचा आहे. त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं. जोपर्यंत १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठिशी आहे, तोवर हे सरकार चालणार आहे. आम्ही देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आलो तेव्हा लोक म्हणायचे ५ वर्ष काय २५ वर्ष सरकार चालणार. कार्यकर्त्यांना, आमदारांना बरं वाटायला सांगत असतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्मला आलेलं नाही. जोपर्यंत १४५ आमदारांची संख्या पाठिशी आहे तोवर हे सरकार चालणार,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा हॅलो ऐवजी जय महाराष्ट्र म्हटलं जायचं. प्रत्येकाचे विचार असतात. जय महाराष्ट्र म्हणणं देखील चांगली गोष्ट आहे. लोकशाहीच्या मार्गानं निवडून गेलेल्या आमदारांनी बहुमतानं अस्थित्वात आणलेलं हे सरकार आहे. आजचा दिवस टीका टिपण्णीचा नाही. सांस्कृतिक खात्याचे जे मंत्री आहेत, त्यांचं वक्तव्य ऐकलं. त्यात हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे,” असं अजित पवार विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
“आपल्याकडे लोकशाही आहे. त्यात परिवारवाद आणू शकत नाही. जर जनतेनं निवडून दिलं तर ते जाऊ शकतात. लोकांना त्यांचं काम आवडलं तर ते निवडून देतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा कार्यकाळ आपण पाहिला. ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, नेतृत्व नाही, त्यांना जर तुम्ही पदावर बसवलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकतात. जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे,” असं ते म्हणाले.