घड्याळ तेच, वेळ नवी..! अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; प्रफुल पटेलांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 03:24 PM2023-11-30T15:24:51+5:302023-11-30T15:25:54+5:30
निवडणूक आयोगाच्या सुनावणीत समोरच्यांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे वेगळे मुद्दे मांडले जातायेत असा आरोप पटेलांनी शरद पवार गटावर केला.
कर्जत - अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं २ दिवसीय चिंतन शिबीर कर्जत इथं आयोजित केले आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगात शरद पवार आणि अजित पवार गटात खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद सुनावणीला आहे. मात्र बऱ्याचदा अजित पवार-शरद पवार एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. त्यावर प्रफुल पटेल यांनी खुलासा केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात पुढची वाटचाल काय असावी हे निर्धारित करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. घड्याळ तेच, वेळ नवी ही आमची टॅगलाईन आहे. दोन्ही गट एकत्र येणार असं अनेकांकडून दिशाभूल करण्याचं काम होतंय. पण आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वातच काम करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत हे आम्ही स्पष्ट करतो असं पटेल यांनी म्हटलं आहे.
प्रफुल पटेल म्हणाले की, निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या कार्यवाहीवर भाष्य करणार नाही. आमच्या वकिलांचा युक्तिवाद बाकी आहे. आम्ही जो निर्णय घेतलाय त्यात कुठेही अडचण येणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत समोरच्यांकडे काही मुद्दे नाहीत त्यामुळे वेगळे मुद्दे मांडले जातायेत. ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते किरकोळ मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतायेत. सुनावणीनंतर त्यांचे वकील कार्यकर्त्यासारखे ब्रिफ्रिंग करत असतात हे हास्यास्पद आहे. जे काही आहे ते सत्य बाहेर येणारच आहे.आम्हाला जे पुरावे द्यायचे होते ते आम्ही दिलेले आहेत. बाकीचे सगळे मुद्दे जे आज उपस्थित केले त्याचा खुलासा होणार आहे. आमची बाजू मांडण्यात अडचण वाटत नाही. आमच्या वकिलांना संधी मिळाली तर एकाच सुनावणीत सगळे मुद्दे आम्ही मांडू शकतो असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोगात काय भूमिका आम्ही मांडली हे आम्हाला माहिती आहे. जगात असे कुठेही लिहिलं नाही की आजचे २ मित्र उद्या भांडू शकत नाही. आज एकत्र असणारे २ व्यक्ती उद्या वेगळी भूमिका घेऊ शकत नाही ? जेव्हा मुद्दे नसतात तेव्हा फालतू मुद्दे घेतले जातात. पक्षात कालपर्यंत आम्ही एकत्र होतो आणि आज आमची नवीन भूमिका आहे. कायद्यात असे कुठेही लिहिले नाही असं सांगत प्रफुल पटेल यांनी शरद पवार गटानं निवडणूक आयोगासमोर मांडलेल्या युक्तिवादावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीत अजित पवार गटानं शरद पवारांविरोधात उमेदवार उभा का केला नाही असा युक्तिवाद निवडणूक आयोगात शरद पवार गटानं मांडला होता.
भुजबळ मांडतायेत ती सरकारचीच भूमिका
छगन भुजबळ जे काही बोलले त्यात कुठेही सरकारच्या विरोधात विधान नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारची भूमिका आहे तीच भुजबळांनी मांडली. ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची सर्वांची सहमती आहे तीच भूमिका राष्ट्रवादीची आणि महायुती सरकारचीही आहे. आगामी काळात अधिवेशनात सगळ्या गोष्टी मांडण्याची संधी सर्वांना मिळेल.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण ते कायद्याच्या चौकटीत हवं अशी आमची ठाम भूमिका आहे.जेव्हा मुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी गेले होते. त्यावेळी निजामकाळातील जे दाखले असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळावे यासाठी समिती नेमली होती. त्या प्रसंगावर भुजबळ बोलले. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही असं विधान आमच्यापैकी कुणाकडूनही आलेले नाही असं स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिले आहे.
आगामी वाटचालीसाठी चिंतन
राष्ट्रवादीच्या आज आणि उद्याच्या भविष्यावर चिंतन शिबिरात चर्चा केली जात आहे. २ दिवसीय शिबीर कर्जत इथं आयोजित करण्यात आले आहे. आमच्या शिबीराच्या माध्यमातून आम्ही राजकीय उत्तर देऊ. सगळे पक्ष निवडणुकीच्या उद्देशाने काम करतायेत. आमचा पक्ष सांभाळायचा ही प्राथमिक जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला काम करायचे आहे. येणाऱ्या काळात सामाजिक जे प्रश्न निर्माण झालेत किंवा इतर महत्त्वाच्या विषयात राष्ट्रवादीची भूमिका काय असावी? राज्याचा विकास आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काय करता येईल त्यावर चिंतन शिबिरात चर्चेवर भर देण्यात येईल असं पटेलांनी म्हटलं.