राजकीय सत्तानाट्यात NCP नेते क्वारंटाईन; अजितदादांनंतर आता छगन भुजबळांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:35 PM2022-06-27T18:35:40+5:302022-06-27T18:37:18+5:30
राज्यात बंडाचे वादळ उठलं असताना सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोरोनाच्या विळख्यात अडकले
मुंबई - राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राजकीय वातावरण पेटलं आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटातील आमदारांना दिलासा देत विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत दिली. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या १६ जणांच्या अपात्र नोटीसवर कुठलीही कारवाई सध्यातरी होणार नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात सत्तासंघर्षाला वेग आला आहे.
शिंदे गट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं सांगणार आहे. या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. भुजबळ यांनी ट्विट करून म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात बंडाचे वादळ उठलं असताना सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोरोनाच्या विळख्यात अडकले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना झाल्याने त्यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रविवारीच सोडण्यात आले आहे. आज अजित पवारांनी ट्विट करून कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पवारांनी केले आहे.
ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी?
एकीकडे गुवाहाटीत बंडखोर आमदारांची रणनीती ठरत असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाची कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. या बैठकीत देखील भाजपाच पुढील खेळी काय असेल यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदे गट राज्यपालांकडे ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्याची शक्यता आहे. यासाठी शिंदे गट मुंबईत येणार की त्यांचे प्रतिनिधी येणार हे अद्याप ठरलेले नाही. शिवसेनेने आमदार मुंबईत आले तर ते आपल्याबाजूने येतील असा विश्वास पक्षनेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातलं राजकीय चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे.