Maharashtra Karnataka Border Dispute: दिल्लीत सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक सीमा प्रश्नासाठी नव्हे तर सीमेवरील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होती असे घुमजाव कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. यानंतर आता महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यातच आता आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी एकामागून एक ट्विट करत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सीमाप्रश्ना संदर्भात नव्हतीच तर केवळ कायदा-सुव्यवस्थे संदर्भात असल्याचे सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली? असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विधाने बघता काही गोष्टी स्पष्ट होतात
दुसऱ्या एका ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विधाने बघता काही गोष्टी स्पष्ट होतात. ते त्यांच्या केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्राचे नेते ज्याप्रमाणे घाबरून आहेत, त्याप्रमाणे घाबरत नाहीत किंवा महाराष्ट्राच्या नेत्यांना जो केंद्रीय सपोर्ट नाही तो छुपा केंद्रीय सपोर्ट त्यांना आहे. किंवा येणाऱ्या निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने ते भावनिक विषय छेडून आपली बाजू भक्कम करत आहेत. पण ते काही असो महाराष्ट्र मात्र महाराष्ट्र सरकारप्रमाणे गप्प बसणार नाही,हे बोम्मई यांनी लक्षात घ्यायला हवे, असा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.
दरम्यान, कर्नाटकात सीमाप्रश्नासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना सर्वपक्षीय नेत्यांनीच सावरले, आणि एक अनोखा एकोपा कर्नाटक विधिमंडळाने सीमाप्रश्नाच्या बाबतीत दाखवून दिला. यावरून महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी धडा घेण्याची गरज आहे, कारण सीमाप्रश्नावर कर्नाटकातले सर्व पक्ष एकत्र येतात मात्र महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकमेकाची ऊणी-धुणी काढण्यात धन्यता मानतात. त्यामुळे सीमा भागातील लोकांची महाराष्ट्रातील नेत्यांच्याकडून उपेक्षा होते त्याचबरोबर अपेक्षा भंगही होतो, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"