अहमदनगर: आताच्या घडीला राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेले दिसत आहे. ओबीसीसह धनगर समाजालाही आरक्षण मिळणेबाबत जोरदार मागणी पुढे होऊ लागली आहे. दोन्ही समाजातील नेते मंडळी यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रात आपले वजन वापरावे आणि मराठा तसेच धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी विनंती केली आहे.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते.
मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पण सध्या जीर्ण झालेल्या वास्तूंचा सरकारने जीर्णोद्धार करावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राला जादा निधी द्यावा. तसंच आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढविण्यासाठी शरद पवार यांनी आपले वजन वापरून केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत. त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. चौंडीतील आजच्या अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचा मी संयोजक नाही, कार्यक्रम समितीने आयोजित केला आहे, मी केवळ एक कार्यकर्ता आहे.
राजकारण्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून शिकवण घ्यावी
देशात १३० पेक्षा जास्त मंदिरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली, महिलांची सोय व्हावी यासाठी कित्येक ठिकाणी नदीवर घाट बांधले. दुष्काळात मंदिर किंवा घाट बांधण्याचे काम करून त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला. अहिल्यादेवींच्या राज्यात धार्मिक आणि जातीभेद नव्हता. हल्लीच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून ही शिकवण घ्यावी, असा टोला लगावत मागील पाच वर्षांत चौंडीतील विकास कामे थांबली होती. गेल्या दोन वर्षांत ती पुन्हा मार्गी लागली. भविष्यात चौंडीत अहिल्यादेवींचे संग्रहालय उभारण्याचे नियोजन आहे, असा मानस रोहित पवार यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, रोहित पवार या तरुणाच्या हाती सत्ता दिली, याचा आनंद आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळी कर्जत-जामखेड तालुक्यातही मोठा दुष्काळ पडला होता. येथील दुष्काळ हे जुने दुखणे आहे. या तालुक्यातील दुष्काळ पाहण्यासाठी शेजारच्या अकोले गावात दुष्काळ पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यांनी येथील दुष्काळाची स्वत: पाहणी केली. मात्र दुर्दैवाने त्यावेळेपासून आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. मला सांगायला आनंद होत आहे की, रोहित पवार यांनी या भागात पाणी, उद्योगाचे प्रश्न सोडविले, असे कौतुक शरद पवार यांनी केले आहे.