पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापा टाकला. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. दरम्यान, या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“दिवसभरातील राजकीय घडामोडी बघून आठवड्याभरापूर्वी गडकरी यांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना माझीही झालीय. परंतु अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं!,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.