“राजकारणात येऊन चूक केली का?”; अजित काकांच्या बंडानंतर रोहित पवार भावनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:05 AM2023-07-03T11:05:44+5:302023-07-03T11:06:35+5:30
शिवसेना-राष्ट्रवादी ही भाजपसमोरील मोठी आव्हाने असून, या दोन पक्षांमुळे आपली एकहाती सत्ता येऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे, असे रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar And Ajit Pawar:अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे या घडामोडींनंतर भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
अजितदादांच्या बाबतीत व्यक्तिगत भावनिक आहे. ते माझे काका आहेत. त्यांनी अनेक वेळा मला मदत केली आहे. व्यक्तिगत जीवनातही मदत केली आहे. त्यामुळे काकांबद्दल बोलत असताना, राजकारण बाजूला ठेवले तर नक्कीच मी भावनिक झालो आहे. शेवटी तो राजकारणाचा भाग आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले आहे, असे रोहित पवार म्हणाले. ते मीडियाशी बोलत होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपसमोरील मोठी आव्हाने
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपसमोरील सर्वांत मोठी आव्हाने होती. त्यामुळे भाजपने ज्यापद्धतीने शिवसेना फोडली तसा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बाबतीत होईल, असा अंदाज होता. अजित पवार जातील याचा अंदाज कोणाला नव्हता. नजीकच्या काळात लोकनेते कोण असा विचार केला तर बाळासाहेबांचा उल्लेख केल्याशिवाय राहता येत नाही. तसेच शरद पवारांचाही उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही. लोकनेत्यांनी सुरु केलेला पक्ष जसे की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रात भाजपला एकहाती सत्ता आणण्यापासून रोखू शकतात हे भाजपला माहिती असावे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
दरम्यान, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात घडत आहे ते पाहून मतदारांचे म्हणणे आहे की राजकारण गलिच्छ झाले आहे. मत देऊन चूक केली आहे की असे वाटू लागले आहे. केवळ मतदारच नाही तर ध्येय घेऊन,विचार घेऊन राजकारणात आलेल्या आमच्यासारख्यांनाही वाटते की राजकारणात येऊन चूक केली का? असा प्रश्न पडतोय. हे पाहून राजकारण करायचे की नाही असाही विचार मनात येतो. सामान्य लोकांचे नेते कसे असतात हे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्याकडे पाहून कळते. आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते अशाच लोकांकडून प्रेरणा घेत असतात, असे रोहित पवार म्हणाले.