Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे सुषमा अंधारे अडचणीत सापडल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी भाषणात जे विधान केले त्यामुळे वारकऱ्यांची भावना दुखावली असल्याचे बोलले जाते. ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही, अशी शपथ वारकऱ्यांनी घेतली आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वारकरी संपद्राय आक्रमक झाला आहे. याप्रकरणी संतांच्या बाबतीत चुकीचे विधान केल्यास माफी मागावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे एका वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. संतांनी रेड्याला शिकवले. पण माणसांना कुठं शिकवलं?, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले असल्याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तोच दाखला देत अंधारेंनी हे वक्तव्य केले. पण त्यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.सुषमा अंधारे यांनी माफी मागावी अशी मागणी झाली. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक सल्ला दिला आहे.
संतांच्या बाबतीत चुकीचे विधान केल्यास माफी मागावी
संतांच्या किंवा महापुरुषाच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये. तसे विधान केल्यास माफी मगितली पाहिजे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीने संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी बोलताना, सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफीही मागितली आहे. वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचे चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही, असे म्हणत त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.
दरम्यान, हिंदू अध्यात्मिक परंपरेचा अवमान केल्याप्रकरणी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज भाजीपाला संघटना व वारकरी संप्रदायाशी संबंधित महिलांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेवर शाई व जोडे फेकण्याचे आंदोलन केले. श्रीमद् भगवद्गीता हा हिंदू धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. वारकरी सांप्रदायामध्ये सामाजिक, आर्थिक व नैसर्गिक विषमता याला फाटा देऊन प्रेम व भक्तिला समाविष्ट केले आहे. अशा या महान परंपरेवर सुषमा अंधारे यांनी विकृत मानसिकतेतून चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमंत व रामायणातील प्रसंगांची खिल्ली उडविणारे वक्तव्य केले आहे. यामुळे समस्त नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"