मुंबई : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी भाजपाने सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले होते. त्यात, मुंबईतील आझाद मैदान येथील सभेत बोलताना वारिस पठाण यांच्या विधानावरुन फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, असे म्हणत टोला लगावला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.
"फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना आम्ही शिवसेनाप्रमाणे बांगड्या घातल्या नसल्याचे वक्तव्य केले असून, त्या विधानाचे आम्ही निषेध करतो. बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे. पौराणिक कथेमध्ये सुद्धा 'महिषासुर' नावाच्या असुराचा वध बांगड्या घातलेल्या देवीने केला होता, हे फडणवीस विसरले असतील. मात्र, आपल्या सारख्या नकारात्मक विचार असणाऱ्या 'असुराचा' वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही", असे चाकणकर म्हणाल्यात.
तर स्त्री-पुरुष समानता समजून घेण्यामध्ये फडणवीस हे कुठे तरी कमी पडले आहेत. त्यामुळे सातत्याने त्यांच्यामधील मनुवाद उफाळून येत आहे. कुठेतरी स्त्रियांना दुय्यम लेखायचं, त्यांच्यावर अत्याचार करायचा, अन्याय करायचा, त्यांच्या इज्जतीचे वावडे ओढत राहायचे ही त्यांच्या संस्कृती भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांची फडणवीस यांनी माफी मागायला हवी, अशी मागणीही चाकणकर यांनी केली आहे.