मुंबई – राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार नसून सर्कस सुरु आहे असा टोला लगावला होता त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राजनाथ सिंह यांना प्रतिटोला लगावला आहे.
गेल्या २ दिवसांपासून शरद पवार हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावांना शरद पवार भेटी देत आहेत. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, आमच्या सर्कशीत प्राणी आहे फक्त विदूषकाची कमतरता आहे अशा शब्दात त्यांनी राजनाथ सिंहावर टीका केली. त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी राज्यात सर्कस सुरु आहे, त्यांच्या सर्कशीत प्राणी आहे हे मान्य केलं आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो, शेवटी राजकारणात एकाने बॉल मारला आणि दुसऱ्याने टोलावला असं होत असतं. हे जास्त काळ लक्षात ठेवण्यासारखं नसतं. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे असं ते म्हणाले.
तर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनीही राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने देखील (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत अशा शब्दात मलिकांना राजनाथ सिंह यांना टोला हाणला.
काय म्हणाले होते राजनाथ सिंह?
राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे, त्यात माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे, खुद्द देशातील दिग्गज नेते शरद पवारांच्या मार्गदर्शनाने हे सरकार सुरु आहे. हे सरकार सर्कस आहे. दिशाहिन सरकार चाललं आहे याची कल्पनाही मी करु शकत नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
होय, चीननं भारताच्या ‘या’ जमिनीवर कब्जा केलाय; लडाखमधील भाजपा खासदारानं दिली यादी
Video:...अन् मनसे नेत्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव
Parle G: स्वदेशी आंदोलनातून मिळाली प्रेरणा; जगात गाजणाऱ्या बिस्किट कंपनीचा ‘असा’ आहे इतिहास!