मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षातील अंतर्गत वादामुळे आता पक्षाचे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तसेच शिवसेना पक्षाचे नावही तात्पुरता वापरता येणार नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना कोणत चिन्ह आणि नाव वापरणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिवसेनेला नवं नाव सुचविले आहे.
चिन्ह गोठवल्याने शिवसेना पक्ष संपणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
आज खासदार शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.शिवसेनेचे चिन्ह आणि नावावर दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 'या निर्णयाचा महाविकास आघाडीवरही कोणताही परिणाम होणार नाही.सेनेला आता तातपुरते नवे नाव शोधावे लागणार आहे. मी असं नाव सुचविन की, शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे, असं नाव द्यायला पाहिजे, असं शरद पवार यांनी शिवसेनेला नवे नाव सुचविले. हे असं याअगोदर काँग्रेसमध्ये झाले आहे, याअगोदर इंदीरा गांधी यांच्या काळात झालेल्या दोन घटनांचे पवार यांनी यावेळी उदाहरण दिले.
शिवसेनेने निवडणुकांना सामोरे जायची तयारी अगोदर केली पाहिजे
"शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात येणार असं काही होणार याची मला खात्री होती. याचे मला आश्चर्य वाटले नाही, निर्णय कोण घेत हे मला माहित नाही. आता शिवसेनेने निवडणुकांना सामोरे जायची तयारी अगोदर केली पाहिजे. याअगोदर मी स्वतं: वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे, त्याचा काही तोटा होत नाही. लोक ठरवतात कोणाला निवडून द्यायचे. शिवसेना पक्ष यामुळे अजिबात संपणार नाही उलट पक्ष जोमाने पुन्हा वाढेल, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा
शिवसेनेतील या वादामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' नव्हे, हे तर 'ऑपरेशन डिवाइड अँड रूल' होते. इंग्रजांची पॉलिसी वापरून एक हौशी मोहरा वापरला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांची शिवसेना व धनुष्य बाण गोठवले. पण भाजपने हे लक्षात ठेवावे, त्यांनी खेळलेला हा डाव कधी त्यांच्यावर देखील उलटला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.