Maharashtra Politics: भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर भाष्य करताना, संविधानाच्या विरोधात जे काही झाले असेल त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असे शरद पवार म्हणाले.
संविधानाच्या विरोधात जे काही झाले असेल त्याची चौकशी व्हावी
नवे राज्यपाल आले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? राज्यपाल कोश्यारी यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, संविधानाच्या विरोधात जे काही झाले असेल त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर भाष्य करताना, नुकताच सर्व्हे आला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ३० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोदी सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना हटवले, अशी टीका करत, केंद्रातील सरकार हे अदानीचे चौकीदार आहे. त्यामुळे केंद्राने राज्यपालांना बदलले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचेच काम केले. त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागणार आहे, या शब्दांत नाना पटोलेंनी हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"