राष्ट्रवादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या व आता शरद पवार गटात असलेल्या सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मे महिन्यात दुहान या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, नंतर त्यांनीच खुलासा करत मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असे स्पष्ट केले होते.
सोनिया दुहान यांच्या कार्यालयाकडून एक्स अकाऊंटवर सोनिया दुहान या आज हरियाणा काँग्रेसमध्ये जात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश कार्यक्रमाला भुपेंदर सिंह हुडा, प्रदेशाध्यक्ष उदयभान, काँग्रेस प्रभारी दीपक बावरिया आदी उपस्थित असणार आहेत असे म्हटले आहे. दुपारी १ वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
माझी शरद पवारांवर निष्ठा कायम आहे, मी पक्ष सोडलेला नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे दुहान यांनी मे महिन्यात सांगितले होते. आता हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर दुहान या काँग्रेसमध्ये जात आहेत. दुहान यांनी सुप्रिया सुळे या आमच्या लीडर कधीच होऊ शकल्या नाहीत. आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.
कोण आहे सोनिया दुहान?
सोनिया दुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी या आमदारांची सुटका करण्यासाठी सोनिया दुहान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांची सुखरुप सुटका करण्याची जबाबदारी सोनिया दुहान आणि कार्यकर्त्यांनी समर्थपणे पार पाडली होती. सध्या प्रफुल पटेल हे अजित पवार गटात गेल्याने शरद पवारांनी सोनिया दुहान यांना दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे.