Anjali Damania ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या अपघात प्रकरणानंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. विरोधी राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही या प्रकरणात प्रशासनाकडून झालेल्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे अपघातावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर खरमरीत टीका केली. चव्हाण यांची ही टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया यांनी एक्सवर अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे की, "आज मला प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात? आज मला त्या सूरज चव्हाणने 'रीचार्जवर काम करणारी बाई' असं म्हटलं. मला असं बोलावं? मी काय आहे आणि किती सिद्धांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगले कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का ? त्यांनी राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता? मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांचाकडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे," अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
"मला इतर महिला राजकारण्यांची प्रतिक्रिया पण हवी आहे. कारण असली थर्ड ग्रेड भाषा राजकारणात पूर्ण पणे थांबलीच पाहिजे," असं म्हणत अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनाही याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण हे त्यांची माफी मागणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.