मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं निधन झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांनी गुरुवारी रात्री बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना नातवंडे असा परिवार आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी डावखरे यांची ओळख होती. राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. ठाण्यातील हरी निवास येथील गिरीराज हाइट्समध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डावखरे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.डावखरे यांचे बालपण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे या गावी गेले. अत्यंत कष्टात बालपण घालवलेल्या वसंत डावखरे यांची राजकीय कारकीर्द ठाणे शहरात बहरली. महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांनी विद्यार्थी संघटनेत काम केले. पदवीधर झाल्यानंतर त्यांची ओळख राजकारणातील तत्कालीन मातब्बर नेते बाळासाहेब देसाई यांच्याशी झाली. डावखरे यांनी काही काळ देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काळ काम पाहिले. 1980 साली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डावखरे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असतानाही काही भाजपाच्या नगरसेवकांशी मैत्रीचा हात पुढे करून त्यांनी 1987मध्ये प्रथमच महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणली. काही काळ त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषविले. 1992 साली डावखरे राज्य विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 18 वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषविले. राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला. डावखरे यांचे कै. आनंद दिघे आणि त्यांची राजकारणापलीकडची मैत्रीही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेत राहिली. 1986-87 साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेचे सतीश प्रधान त्या वेळी महापौर होते. शिवसेनेची सत्ता असतानाही भाजपाचे देवराम भोईर, सुभाष भोईर आणि गोवर्धन भगत यांच्याशी त्यांनी मैत्री केली. भाजपाच्या पाचपैकी तिघांनी काँग्रेसला मदत केल्यामुळे शिवसेना-भाजपा मिळून, 32 तर काँग्रेसचे संख्याबळही समसमान अर्थात 32 झाले. तेव्हा जनता पक्षाचे दशरथ पाटील यांचे 33वे मत मिळवून डावखरे महापौर झाले. 1987 ते 1993 पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. 1992मध्ये ते राज्य विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर 1998मध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीतही त्यांनी सात मतांनी विजय मिळवला. ‘मातोश्रीचे’ आशीर्वाद, ‘गणेशाची’ कृपा म्हणून ‘आनंद’दायी घटना घडली आणि जीवनात ‘सोनियाचा’ दिवस उजाडला, असे त्यांनी या यशाचे मार्मिक वर्णन केले होते. तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि त्यांची मैत्रीही चांगलीच गाजली होती.राजकारणात राहून सर्वांशी घट्ट मैत्री असलेल्या वसंतराव डावखरे यांनी बालपणापासूच टाकीचे घाव सोसले होते. गरिबी आणि दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर डावखरे कुटुंबाने पुण्याच्या शिरूर गावातून थेट ठाणे गाठले. ठाण्यात पालिकेत सत्तापालट केल्यानंतर अनेक निवडणुका त्यांनी लढल्या; पण कुणाशीही वैर न करता ‘मैत्री’ विणून राजकारणातील ‘दोस्ती’ घट्ट केली. त्यांच्या जाण्याने राजकारणातील ख-या अर्थाने ‘वसंत’ हरपल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.शेतकरी कुटुंबात वाढलेल्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठीही संघर्ष कराव्या लागणा-या वसंतरावांना देशभक्तीचे बाळकडू त्यांचे वडील शंकरराव यांच्याकडून मिळाले. दत्ताजी ताम्हाणे यांच्यासोबत स्वातंत्र्यलढ्यात शंकरराव सहभागी झाले होते. हिवरे गावच्या सरपंचापासून थेट विधान परिषद उपसभापतीपदापर्यंतचा प्रवास या अभ्यासू कार्यकर्त्याने पूर्ण केला. टाकीचे घाव सोसून चांगले कर्तृत्व, बुद्धिचातुर्य आणि मोठ्या लोकसंग्रहाच्या बळावर जनमानसाप्रमाणेच सर्वपक्षीय राजकारण्यांमध्येही मैत्रीचे संबंध ठेवून ते टिकवणारी आणि निभावणारी व्यक्ती म्हणजे वसंतराव, अशी त्यांची ख्याती होती. कार्यकर्तृत्वाच्या चढ्या आलेखामुळेच राजकारणातील देव माणूस म्हणूनही ते ओळखले जात होते.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 11:09 PM