मुंबई: ठाणे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं त्यांनी बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पुढे 1987 साली ते ठाण्याचे महापौरही झाले. 1992 पासून ते चारवेळा महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून गेले.
अंतिम दर्शन: स. ११ ते दु. २ गिरिराज हाइट्स , हरी निवास , ठाणेअंतिम संस्कार: दुपारी ३ वाजता
वसंत डावखरे यांचा अल्पपरिचय-
जन्म ८ नोव्हेंबर १९४९. ( ६८ वर्षे)
१९८६ ठाणे महापालिका स्थापन झाली तेव्हा काँग्रेसतर्फे नगरसेवक म्हणून निवडून गेले. वसंत डावखरे ठाणे महापौर २१-३-१९८७ ते १९-३-८८.
१९९२ पासून ते विधानपरिषदेवर निवडून जात होते. सतत चार वेळा विधानपरिषदेवर ते निवडून गेले आहेत.
१९९८ पासून त्यानी विधानपरिषदेचे उपसभापतीपद भूषवले. १३ जुलै २०१० ला त्याची विधानपरिषद उपसभापतीपदी फेरनिवड झाली होती. ठाणे व कल्याण लोकसभा त्यानी लढवली मात्र आनंद परांजपे ( शिवसेना) यांच्याकडून त्याना पराभव पत्करावा लागला होता.
९ जून २०१० ते ८ जून २०१६ काळात ते शेवटचे विधानपरिषद सदस्य म्हणून शिवसेनेच्या रविंद्र फाटक यांचा पराभव करून निवडून आले होते.
२५ मे १९९९ ला शऱद पवार यानी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी काँग्रेस सोडून डावखरे राष्ट्रवादीत गेले.
२०१० साली ते विधानपरिषदेवर बिनविरोध निव़डून गेले. त्यावेळी शिवसेना उमेदवार रमेश जाधव यानी माघार घेतल्याने वसंत डावखरे बिनविरोध निवडून गेले.
किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बॉम्बे रूग्णालयात करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही काळ सोडता त्यांची तब्येत अनेकदा बिघडत होती. बॉम्बे रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.