मुंबई: शिवसेनेला सोडून राज्यात सत्ता स्थापन करायची नाही अशी भाजपाची भूमिका होती, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या दाव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शिवसेनेला सोडायचं नाही, अशी भूमिका होती. मग त्यांना मुख्यमंत्रिपद का दिलं नाही, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर भाष्य केलं. शिवसेनेनं आपल्याला दगा दिला, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांकडून आम्हाला सत्तास्थापनेची ऑफर होती. मात्र, शिवसेनेला वगळून आम्हाला राज्यात सरकार स्थापन करायचं नाही अशी आमची भूमिका होती, असा दावाही फडणवीस यांनी मुलाखतीत केला होता.फडणवीसांनी केलेल्या दाव्यावरून विद्या चव्हाण यांनी टोला लगावला. 'देवेंद्र फडणवीस हे अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत. ते करत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. त्यांना शिवसेनेला सोडायचं नव्हतं, मग त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद का दिलं नाही, असा सवाल चव्हाण यांनी केला. 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. फडणवीस यांनी हे वास्तव स्वीकारायला हवं, अशा शब्दांत चव्हाण यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिमटा काढला. त्या 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?'मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसला वेगळे पाडून राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून निर्देश आले होते. राष्ट्रवादीही सोबत येण्यास तयार होती. मात्र हे करत असताना शिवसेनाही सत्तेत राहील, ही अट ठेवण्यात आल्यानं राष्ट्रवादी सत्तेत आली नाही', असे ते म्हणाले. 'शिवसेनेने पाठ फिरवल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाची व आपलीही राष्ट्रवादीशी बोलणी झाली होती. राष्ट्रवादी व भाजपनं एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचं ठरलं होतं. तसंच हे अजित पवार यांच्यासोबत नव्हे, तर थेट राष्ट्रवादीसोबत ठरलं होतं', असे ठासून सांगत त्यांनी शरद पवार यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवलं.