मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. दिवसभरातील घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रस्ताव फेटाळल्याचे पाहायला मिळाले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आणि मातोश्रीवर दाखल झाले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडायला नको होता, असा नाराजीचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून उमटल्याचे सांगितले जात आहे.
दिवसभरातील घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढल्याचे पाहायला मिळाले. मुंबईसह राज्यातील अन्य आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासह काही मंडळी होती. मात्र, यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या अन्य एका बैठकीत उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगला सोडण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत राज्याच्या राजकारणातील सद्यस्थिती आणि महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा करण्यात आल्यास त्याची रणनीति कशी असेल, यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याच वेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या सगळ्या घडामोडींमागे शिवसेनेच्या आणखी एका बड्या नेत्याचा हात असू शकतो का, अशी शंकाही या बैठकीत उपस्थित करण्यात आली. कारण शिवसेनेतील बडा नेता यात सहभागी असल्याशिवाय शिवसेनेतील एवढा मोठा गट फुटून जाणारी नाही, असा दावा या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्री उपस्थित होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शेवटपर्यंत लढूया, असे सांगत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना बळ दिल्याची माहिती देण्यात आली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील येऊन गेले. मोह माया सत्ता याचा आम्हाला लोभ नाही. आम्ही लढत राहू. शेवटी सत्याचा विजय होईल अशी भूमिका आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी येऊन महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी ज्या सद्भावना व्यक्त केल्या त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.