मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सत्ताधारी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किमान दोन आकडी जागा हव्यात, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे शुक्रवारी दिल्लीला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
आम्हाला चार-पाच जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. महायुतीत बुधवारी जागावाटपाचे आकडे निश्चित झाले नाहीत. अमित शाह आणि आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. आम्ही लवकरच दिल्लीला जाणार असून, तिथे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
१६ जागांचा घेतला आढावा राष्ट्रवादीने नाशिक, दिंडोरी, गोंदिया - भंडारा, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड, कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर दक्षिण, गडचिरोली या १६ जागांचा आढावा घेतला असून, त्यातील १३ जागांची यादी भाजपला सादर केली आहे. मात्र, जागावाटपात ११ जागांवर तडजोड करण्यास पक्ष तयार असल्याचे पक्षातील सुत्रांनी सांगितले.
शिवसेनेच्या बरोबरीने जागांचा आग्रह पक्षाला लोकसभेच्या केवळ चार - पाच जागांची ऑफर दिल्याचा इन्कार सुनील तटकरे यांनी केला, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर भाष्य करणार नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या बरोबरीच्या जागा मिळाल्या पाहिजेत, यावर मी फक्त भाष्य करू शकतो, असे भुजबळ म्हणाले.