अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करणार की नाही, अशी लेखी तक्रार राष्ट्रवादीचे नगर जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सुजय विखे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपची उमेदवारी मिळवलीआहे. स्वत: विखे हे काँग्रेसमध्येच आहेत. मात्र ते मुलाचा प्रचार करताना दिसत आहेत. नगरला युतीचा उमेदवार निवडून येईल, असे ते माध्यमांसमोर उघडपणे सांगतात, याकडे अंकुश काकडे यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.या पत्रासंदर्भात विखे यांना छेडले असता ‘काकडे यांनी काय पत्र पाठविले हे मला माहीत नाही. या पत्राबाबत काकडे व पक्ष निर्णय घेईल. मी काय बोलू’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विखे आमच्या मांडीला मांडी लावून: भाजप नेतेपुत्र सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हे देखील आता भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ एप्रिलला नगरला सभा आहे. त्यावेळी किंवा तत्पूर्वी ते भाजपात जातील, असे बोलले जाते. यासंदर्भात पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘राधाकृष्ण विखे व आमच्यातील अंतर आता खूपच कमी झाले आहे. सध्या आम्ही मांडिला मांडी लावूनच एका बैठकीत बसलेलो आहोत’. पालकमंत्र्यांच्याच भ्रमणध्वनीवर विखे यांच्याशीही बोलणे झाले. त्यांनी मात्र ‘नो कॉमेंट’ म्हणत या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले.