'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 03:30 PM2023-07-05T15:30:23+5:302023-07-05T15:34:11+5:30
NCP Maharashtra Political Crisis:'हिम्मत असेल तर शरद पवारांच्या चेहऱ्याऐवजी स्वतःचा चेहरा वापरा आणि निवडून या.'
NCP Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत पक्षाचे दोन मोठे मेळावे झाले. एकीकडे अजित पवार गटाचे नेते, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते. शरद पवार गटाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं काही दिलं, मंत्रिपदे दिली, सर्व अधिकार दिले, त्यांना आज तुम्ही प्रश्न विचारता...
आव्हाड पुढे म्हणाले, तुम्हाला निवडणूक प्रचारासाठी शरद पवार लागतात, सगळ्या गोष्टींसाठी शरद पवार लागतात. आता अचानक उठून म्हणतात, आम्हाला शरद पवार नको. जर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असाल, तर कशाला साहेबांचा चेहरा वापरता. तुम्ही स्वतःचा चेहरा वापरा आणि निवडून या. उन्हात, पावसात, आजारपणात, 30 वर्षे घाम गाळून साहेबांनी पक्ष उभा केला आणि तुम्ही सभेतून साहेबांना प्रश्न विचारता. तुम्ही साहेबांना जखमी केलं आहे, पण आता हा जखमी शेर आहे.
भुजबळ साहेब, तुम्हाला पवार साहेबांनी काय कमी केलं? 25 वर्षे तुम्हाला मंत्री केलं. सोन्याची कवलं असलेली घरे तुमची आहेत. हे सगळं याच बापाने दिले आहे. तुम्ही मला विचारता शरद पवार माझी खासगी मालमत्ता आहे का? ही सरंजामशीची पद्धत माझ्यात नाही. मी साहेबांच्या पायाची धुळ आहे, माजी लायकी मला माहितीये. ज्यांना 30-30 वर्षे मंत्रिपद दिले, ते आज साहेबांविरोधात भाषणं करत आहेत. एकीकडे त्यांचा फोटो वापरता आणि दुसरीकडे टीका करता. आजपर्यंत तुम्ही ज्यांना शिव्या घालत होता, त्यांच्या जवळ जाऊ बसलात, अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणतात, साहेबांना अंधारात ठेवून तुम्ही शपथविधी केला, तेव्हा हा गुरू आठवला नाही? शरद पवारसुद्धा माणूस आहे, त्यांनाही वेदना होतात. त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतात, पण ते कधीच त्यांचे अश्रू दाखवत नाहीत. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मै समंदर का मियाज हूं, उस नदी को पता नहीं, सब मुझसे आके मिलते है, लेकीन मैं किसी से जाके मिला नहीं. शरद पवार समुद्र आहेत. हे हरणारे सेनापती नाहीत, जिंकून देणारे सेनापती आहेत. आज इथे उपस्थित तुमच्यापैकी अनेकजण आमदार होऊन सभागृहात जातील. आजपासून लढाई सुरू झाली, आता मागे हटणार नाहीत. ही लढाई साहेबांना जिंकून देणार, असा निर्धारही आव्हाडांनी यावेळी केला.