शिंदे गटात नाराजी, राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही; बच्चू कडूंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 06:08 PM2023-07-05T18:08:34+5:302023-07-05T18:09:11+5:30
NCP Maharashtra Politics : अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे.
NCP Maharashtra Politics : गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना घेऊन शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. तशाच प्रकारची घटना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली. अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बंड केले होते. आता तेच नेते सत्तेत सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.
2 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी 30-35 आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केले. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट तयार झाले आहे. एकीकडे शिंदे गटाचे नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होते, तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत.