मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले अजित पवार यांनी कठीण काळात धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याची तिजोरी सुरक्षित ठेवल्यामुळेच आताच्या शिंदे सरकारला पेट्रोल-डिझेलवरील दरकपात करता आली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. शिंदे सरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्यानंतर महेश तपासे यांनी यामागे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांचे श्रेय असल्याचे सांगितले आहे.
पेट्रोल-डिझेलवरील दर कपात केली मात्र हे शिंदे सरकार येताच केंद्र सरकारने सामान्य माणूस आणि गृहिणींच्या किचनवर आर्थिक बोजा जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या जीएसटीच्या रुपाने टाकला आहे. एकीकडे जनतेला दिलासा देत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे त्याअगोदर स्वतः च्या तिजोर्या भरुन घेण्याचे काम भाजपने केले आहे असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयंनी कमी होणार आहेत.
याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पेट्रोल डिझेलचे दर हे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत. केंद्राने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ रोजी केंद्राने करात कपात केली होती. त्यानंतर राज्यांनाही आवाहन केलं होतं. काही राज्यांनी कर कमी केले होते. मात्र महाराष्ट्रात ते कर कमी झाले नव्हते. आज आम्ही पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करात ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.