नाशिक - मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंत्र्यांचं खातेवाटप कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी रात्री खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे कृषी खाते गेले आहे. विशेष म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी अजितदादांनी नाशिक जिल्ह्यातील माणिकराव कोकाटे यांच्याकडे देत त्यांना बळ दिल्याचं बोलले जाते.
मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने अजित पवारांना टार्गेट करण्यात येत आहे. अधिवेशन काळातही छगन भुजबळ कामकाजात सक्रीय सहभागी झाले नाहीत. छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरहून नाशिक गाठले. त्याठिकाणी भुजबळ समर्थकांचा मेळावा घेण्यात आला. यात उघडपणे छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली.
नाशिक जिल्ह्याने अजित पवार गटाला सर्वाधिक ७ आमदार निवडून दिलेत. त्यामुळे याठिकाणी २ कॅबिनेट मंत्रिपदे दादांनी दिली. त्यात माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांची निवड केली. आदिवासी समाजात ३ वेळा निवडून आलेले नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे अनुभवी आणि आक्रमक नेते आहेत. छगन भुजबळांसारख्या नेत्याला मंत्रिपदावरून वगळून अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री आणि झिरवाळ यांची अन्न व औषध विभागावर निवड केली आहे.
कृषी खाते हे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नाशिकमध्ये या खात्याला अधिक महत्त्व आहे. कांदा, द्राक्षांबाबत शेतकरी अत्यंत प्रतिक्रियात्मक असतात. भाव पडल्यानंतर वेळोवेळी होणारी आंदोलने, बाजार समिती लिलाव बंद पाडणे अशी अनेक आंदोलने सातत्याने होतात. माणिकराव कोकाटे यांना या हेवीवेट खात्याची जबाबदारी देत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटनेला या माध्यमातून अधिक बळ देण्याचा अजितदादांचा प्रयत्न असल्याचं बोलले जाते. छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत. अनेकदा कोकाटे यांनी भुजबळांवर उघड टीका केली होती. त्यात यंदाच्या मंत्रिमंडळात भुजबळांना डावलून अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना बळ दिले आहे.
छगन भुजबळांना पक्षातीलच आमदारांचा विरोध?
अलीकडेच नाशिक जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी अजित पवार यांच्याकडे छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याची विनंती केली होती. एवढेच नाही तर, भूजबळांना मंत्रिपद दिले गेले तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकाच वेळी राजीनामे देतील,अशी घोषणाही या आमदारांकडून करण्यात आली होती अशी माहिती माध्यमांत झळकली होती.