लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते कुणाचंच काही ऐकायला तयार नाहीत. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील मुरब्बी राजकारणी शरद पवार यांना मात्र ते भेटले, त्यांच्याशी बोलले. या भेटीनंतर, राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का?, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रोखठोक मत मांडलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेबद्दल मला काही माहीत नाही. परंतु, हा निर्णय असाच घेता येणार नाही. माझ्याशी आणि इतर नेत्यांशी चर्चा करावी लागेल. पक्षाचे विलिनीकरण का करायचे, ते कोणत्या पक्षात करायचे, हे सगळं आम्हाला सांगितलं पाहिजे. सर्व नेत्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ५२ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकणार नाही. काँग्रेसच्या या अपयशाची जबाबदारी स्वीकारूनच राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अर्थात, पक्षातील नेत्यांना त्यांचं हे टोकाचं पाऊल पटलेलं नाही. परंतु, राहुल गांधी कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. असं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. शरद पवार पक्षाचं नेतृत्व करतील आणि राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून भाजपाशी लढतील, असं समीकरण मांडलं जातंय. अर्थात, दोघांपैकी कुठल्याच राजकीय पक्षाकडून काही ठोस संकेत दिले गेलेले नाहीत, पण पवार-राहुल भेटीनंतर चर्चा जोरात सुरू झालीय. हे पाऊल कार्यकर्त्यांना तरी कितपत रुचेल, पचेल, याबद्दल शंकाच असल्याचं उदयनराजेंच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट जाणवतं.