मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर इतर पक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसनं भारिप बहुजन महासंघाला सोबत घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले असताना राष्ट्रवादीनं मनसेची साथ मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मनसे महाआघाडीत आल्यास त्यांना कल्याणची जागा दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र होते. त्यावेळी राज यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर या दोन नेत्यांमधील जवळीक कायम चर्चेत राहिली. आता मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कल्याणची जागा मनसेसाठी सोडण्याची तयारी दाखवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यासाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसलादेखील गळ घातली आहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर राष्ट्रवादीनं स्वत:च्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेसाठी सोडल्याची माहिती मिळते आहे. या ठिकाणी मनसेचे राजू पाटील किंवा त्यांचे भाऊ रमेश पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. मात्र मनसेला आणखी एक जागा हवी आहे. यासाठी राष्ट्रवादीची काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. याचा निर्णय सोमवारपर्यंत होऊ शकतो. मनसेला सोबत घेण्याबद्दल काँग्रेस पक्ष तितकासा अनुकूल नाही. महाराष्ट्रात मनसेला सोबत घेतल्यास त्याचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसेल, असं पक्षाच्या नेत्यांना वाटतं. मनसेची उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. काँग्रेसला होणारं उत्तर भारतीय मतदान कमी होऊ शकतं, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं. मात्र मोदी विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं होतं. त्यामुळे मनसेचं इंजिन आघाडीसोबत धावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मनसेचं होणार 'कल्याण'; महाआघाडीसोबत इंजिन धावणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 6:13 PM