नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद सभेनंतर राज्यात पुन्हा राष्ट्रवादीविरुद्ध मनसे असा राजकीय सामना रंगला आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांचे थेट नाव घेत त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद वाढला असा आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच शरद पवार त्यांच्या भाषणात कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. प्रत्येकाकडे जातीने पाहतात असा आरोप राज ठाकरेंनी केला. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते प्रत्युत्तर देत आहेत.
मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, राज ठाकरेंनी लोकमान्य टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामी यांचे गुणगान गाण्यासाठी सभा घेतली होती. शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठी सभा होती. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे. पण तुम्ही शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? असा सवाल करत हा द्वेष वाढविण्याचा प्रकार योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. तर संभाजी भिडे यांनी आयुष्यभर मुस्लिम द्वेष पसरविला. ते सायकल वरून पडले, खुबा मोडला त्यांचे ऑपरेशन डॉ रियाज उमर मुजावर या मुस्लिम डॉक्टरने केले असंही ते म्हणाले.
तसेच राज ठाकरे यांनी मांडलेला इतिहास धादांत खोटा आहे. राज यांनी इतिहास तपासून बघावा, इंद्रजित सावंत या इतिहासकारने लिहिलेला दाखला आहे की, ३ एप्रिल १६८० मध्ये शिवाजी महाराज यांचे निधन झाले. संभाजी महाराज यांनी समाधी बांधली. त्यानंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी जिंकला, १७७३ ते १८१८ पर्यंत समाधीचा उल्लेख कुठेही नाही, पेशव्यांनी सुद्धा समाधीकडे दुर्लक्ष केले असं इतिहास सांगतो. महात्मा फुले यांनी समाधी १८६९ साली शोधली. पाहिली शिवजयंती फुले यांनी साजरी केली. त्यावेळी टिळक केवळ १३ वर्षांचे होते. टिळकांनी सुद्धा समाधी चांगली बांधावी यासाठी फंड गोळा केला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने निधी गोळा केला. उभ्या हयातीत टिळक यांनी एक खडा सुद्धा बसवला नाही. १९२६ ला इंग्रजांच्या फॉरेस्ट समितीने टिळकांना पत्र लिहून निधींचे काय झाले विचारले तेव्हा ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँकच बुडाली असं सांगितले. त्यानंतर इंग्रजांनी शिवाजी महाराज यांनी चौथरा आणि छत्र बांधले. राज का चुकीचे बोलत होते कळले नाही. दिल्लीत नेहरू गांधी यांना बाजूला सारून नवा इतिहास दाखविला जातोय इथेही फुले, शाहु आंबेडकर यांना बाजूला सारून इतिहास लिहिला जातोय का? ज्यांनी काही केले नाही ते नाव घेत आहेत. दोन वेळा रायगडावर टिळक गेले एकदा रामदास स्वामी आणि नानासाहेब पेशवे यांचे फोटो पुजन केले. त्यांना शिवाजी महाराज स्मारक सापडले नाहीत असंही छगन भुजबळांनी सांगितले.