कोल्हापूर : माजी महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. त्यातील एक प्रांजळ तर दुसरा विरोधकाला राजकीय जीवनातून उठवणारा आहे असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिले. दोन दिवसापूर्वीच पाटील यांनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्राला मुश्रीफ यांनी उलटटपाली उत्तर दिले आहे.
पत्रात मुश्रीफ यांनी म्हटले आहे, चंद्रकांतदादांनी मला पाठवलेले परंतु न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचले व मी आश्चर्यचकित झालो. कारण कोरोनासदृश्य संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून कोरोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी म्हणून निमित्त शोधले, असे वाटते. दादा, गेल्या पाचवर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता व संपत्ती यांचा विचार करता दोन- तीन लाख लोकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल याची खात्री मला आहे. मी व माझ्या फाऊंडेशनने केलेली मदत जाहीर केली तर आपण पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावाल. त्यामुळे मी जाहीर करत नाही असा टोला त्यांना लगावला.
तसेच दादा, यापूर्वी मी अनेकवेळा तुमचे दोन चेहरे-स्वभाव आहेत, असे जाहीर केले. एक तुमचा स्वभाव दिसायला मृदू , लोकांना मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, दिसायलाही प्रांजळ. दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता व संपत्तीचा आपला कोणीही विरोधक मग साधा टीका करणारा असो. त्याचा काटा काढायचा व त्याला जीवनातून उठवण्याचाच प्रयत्न करणारा आहे. मी काय तुमचा शत्रू नव्हतो. जरूर वैचारिक विरोधक होतो. परंतु; मला संपवण्यासाठी केडीसीसी बँकेची कलम ८८ कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणला. राज्य बँकेवर ८८ ची कारवाई सुरु केली. मी सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून कायदा केलात. फक्त मला संपवण्यासाठी! राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक म्हणून ज्यावेळी आमचे नेते अजित पवार, कै. पांडुरंग फुंडकर, आनंदराव आडसूळ, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील इ. मंडळी आपणास या कारवाईबाबत भेटली. आपण त्यांना आपल्या स्वभावाप्रमाणे म्हणाला, "होय, मी चौकशी लावली आहे, ती मागे घेणार नाही. त्यामध्ये मला हसन मुश्रीफ यांना अडकवायचे आहे". यानंतर ईडी, इन्कमटॅक्स सत्र सुरू राहिले. हे मी कधीच काहीही केले नाही. मागील पंधरा वर्षे मंत्री असतानाही व आत्ता सात महिने झाले मंत्री होऊन साध्या शिपायाचीसुद्धा बदली केली नाही. कोणाला त्रास देणे तर सोडाच असं त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
त्याचसोबत माहिती न घेता, माझी बदनामी करण्याची संधी तुम्ही सोडत नाही. ग्रामविकास विभागाने आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळ्या 23 रू ला घेतल्या, त्या बाजारामध्ये 2 रू ला मिळतात, अशी बेजबाबदार विधान केलात. मी बदनामी, फौजदारी दावा दाखल करण्याचे जाहीर केले. या गोळ्या खरेदी करण्याचे जिल्हा परिषदाना अधिकार दिले आहेत. त्यांना 2 रू ला गोळ्या द्याव्यात, असे जाहीर आवाहन करुनही अद्याप तुमचे उत्तर नाही. परंतु; तुमच्या पत्रांमध्ये त्याचा उल्लेखही नाही. पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत ८० टक्के, जिप १० टक्के व पंचायत समिती १० टक्के देण्याचा निर्णय माझ्या विभागाने घेतल्यावर, त्याबद्दल माझा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सुद्धा आपण हा तर केंद्राचा, वित्त आयोगाचा निर्णय आहे. मुश्रीफ कसला सत्कार करून घेत आहेत? अशी टीका केली. त्यानंतर तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी देशांमधील राज्याचे त्रिस्तरीय वाटप आदेश पाठवले. त्याबद्दल, 'माझी चूक झाली, मी माहिती न घेता विधान केले होते' असे म्हणाला पण त्याचाही साधा उल्लेख तुमच्या पत्रामध्ये नाही. अशी अनेक घडलेली उदाहरणे आहेत तुमच्या दोन स्वभावाची. परंतु; जागेअभावी त्याचा उल्लेख करणे अशक्य आहे असं हसन मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान, मी आयुष्यभर सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी, आपले नाव अजरामर रहावे, म्हणून करत आलो. शत्रूलाही मी कधी त्रास दिला नाही, उलट सहकार्य केले. याबाबत माझे सहकारी सातत्याने माझ्या स्वभावावर टीका करत असतात. उदाहरणार्थ - कागलला काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा खून झाला. जो आरोपी आहे, त्याचा भाजपच्या नेत्याबरोबरचा फोटो समाज माध्यमांमध्ये फिरतो आहे. लोक म्हणतात, की त्यांचा पाठिंबा असावा. चौकशी झाली पाहिजे. या गोष्टीला माझा विरोध आहे. फोटो कोणीही काढून घेईल, पुरावे हवेत. विरोधक आहे म्हणून निष्कारण अशा गोष्टी करणे बरोबर नाही. हे मी आयुष्यामध्ये कधी केली नाही. पुरावे असतील तर पोलीस निष्कर्षाप्रत येतीलच. मिळालेली सत्ता अशी राबवायची की, सर्वसामान्यांच्या लक्षामध्ये राहिली पाहिजे. परमेश्वराने, जनतेनेही माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे. चंद्रकांतदादा, मी कोणाचेही आयुष्य बरबाद करणार नाही, त्याला सहकार्यच करेन. हा माझा स्वभाव आहे. मी तुमच्यावर विनाकारण व्यक्तिगत टीका करून तुम्हाला वेदना देणार नाही, बदनामी करणार नाही. याची खात्री ठेवावी असंही मुश्रीफांना पत्रात नमूद केले आहे.