रत्नागिरी : "नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीच्या (NCB) विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय," असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. दापोली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणी भाष्य केलं.
"शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी," अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. "एनसीबीची टीम वानखेडेंच्या चौकशीसाठी आली आहे. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे यांनी घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याची माहिती लवकरच समोर येईल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टीम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी," असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
"नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय," असेही पाटील म्हणाले.