Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यातच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्रातील आमदारांना बेळगावमार्गे कर्नाटकला जाऊन येण्याचे आव्हान दिले आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. महाराष्ट्र इतका कमजोर नाही की आमच्यावर कन्नडिगांनी हल्ला करावा आणि तो आम्ही सहन करावा. जर शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी जाऊ. आंदोलन करू आणि बोमई यांना माफी मागायला भाग पाडू, अशा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत खुले आव्हान दिले आहे.
बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच
अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, सुरतमार्गे गुवाहाटी जाणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो ! महाराष्ट्र संकटात आहे, हिंदुत्व धोक्यात आहे हिम्मत दाखवा, बेळगाव मार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच..., असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. तसेच यापूर्वी, सीमावाद पेटवायला दोन्ही राज्यातील भाजपचे सरकारच कारणीभूत. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपुर्वक सिमावाद पेटवण्याचे दोन्ही राज्यातील सरकारकडून षडयंत्र, अशी टीकाही मिटकरींनी ट्विटरवरून केली होती.
दरम्यान, प्रांतवाद चिघळला असून त्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत, राज्य सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे. सातत्याने हा वाद वाढला पाहिजे अशा पद्धतीने सीमावाद हातळला जात आहे, असा गंभीर आरोपही एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"