मुंबई - ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकतेच सातारा येथील कार्यक्रमात भाषण करताना अजित पवारांवर टीका केली, शरद पवारांच्या समोरच अंधारे यांनी भावूक होत डोळ्यातून पाणी आणत अजित पवारांविरोधात तक्रार केली, माझ्याविरोधात सत्ताधारी इतके आक्षेपार्ह बोलले तरी विरोधी पक्षनेते विधानसभेत काहीही बोलले नाही असं आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्यावर आता राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक भाष्य टोला लगावला आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, सकाळी ६ वाजल्यापासून सातत्याने जनतेच्या सेवेत असणारे नेते म्हणजे अजितदादा पवार आहेत. हल्ली त्यांच्यावर बोलणाऱ्यांचा नवा ट्रेंड आलाय, दादाविरुद्ध रडलो तरी मीडियात प्रसिद्धी मिळते, दादाहो, रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते असं सांगत त्यांनी #रडरागिणी असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारे यांना खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?साताऱ्यातील एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोर भाषण केले, त्या म्हणाल्या की, इथे राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणे गरजेचे आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता अशी तक्रार सुषमा अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारे भावूकत्याचसोबत सभागृहात सांगू शकणार नाही की, शरद पवारांनी माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केले आणि काय नाही. शरद पवारांमुळे माझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसते आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले. मात्र, मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला. शरद पवारांपर्यंत माहिती पोहोचवली. माझ्या एका फोननंतर पुढील ६ तासात दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते असं सांगत सुषमा अंधारेंना रडू कोसळले.